पुणे - शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्तानं आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची आकर्षक आरास करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचं विराजमान झालेलं विलोभनीय रुप पाहायला मिळालं. विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन शेषनागाच्या आकाराप्रमाणं सजावट करण्यात आली आहे. आज पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रम्हणस्पती सूक्त सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता पं. कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने, गणेशजागदेखील पार पडला.
यावेळी दगडुशेठ ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झालं. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून बालक जन्माला आले. त्याच्याकडं पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असं नाव दिलं. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसानं या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकरानं आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकला. त्यानंतर त्यानं पाताळावर आक्रमण केलं. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचं स्मरण केल्याची पुराणकथा सूर्यवंशी यांनी सांगितली.