शिर्डी: राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला दिसतोय. काही दिवसापासून मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेल्या वादाला आता चित्रपटसृष्टीतही मोठं वळण मिळालंय. विशेषतः भोजपुरी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या विधानांमुळं मराठी मंडळींत संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर यांनी आपल्या टीमसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना खोपकर म्हणाले की, "जर कोणी मराठी अस्मितेविरोधात बोलत असेल तर अशा लोकांनी आपली तोंडं बंद ठेवावी. अन्यथा जसं तसं उत्तर मराठी माणूस आणि महाराष्ट्र सैनिक देईल" अशा कडक शब्दांत खोपकरांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांवर निशाणा साधला.