ठाणे : ठाणे शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घोडबंदर रोडवरील खड्ड्यांविषयी जाब विचारला. घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळं मागील सहा महिन्यात 17 नागरिकांचा जीव गेला आहे. त्यामुळं हे जीव नेमकं कोणामुळं गेले? असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. "जर रोडवरील खड्डे लवकरात लवकर बुजवले नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात गाडू. बुधवारी सकाळी घोडबंदर रोडवर अधिकाऱ्यांसमवेत खड्ड्यांची पाहणी करणार आहे", असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं. दरवर्षी याच रस्त्यावर अनेकांचे अपघात होतात. हा प्रकार रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शेकडो कोटींचा खर्च आता करून सर्विस रोड एकत्र करणं सुरू आहे.