नाशिक : एकनाथ खडसे यांनी शनिवारीच चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून येतात असा सवाल उपस्थित केला होता. आता पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये त्यांचे जावई मिळून आलेत. त्या पार्टीमध्ये अनेक अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून त्यांच्या जावयांना देखील अटक केली आहे. असं म्हटलं जातं की, ही पार्टी त्यांच्या जावयांनीच आयोजित केली होती. याचा तपास पोलीस करत आहे. पार्टी सुरू होती आणि या पार्टीत किती महिला होत्या आणि किती पळाले याबाबत मला माहिती नाही. असं काही होणार होत असं खडसेंना माहीत असेल तर त्यांनी जावयांना अलर्ट करायला हवं होतं. मात्र, जावयाला कोणी कडेवर उचललं आणि पार्टीत नेऊन ठेवलं का? असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला. मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये कार्यक्रमानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.