पुणे : पुणे शहर तसंच आजुबाजूच्या परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणातून 25 हजार क्युसेक्सनं पाण्याचं विसर्ग वाढविण्यात आल्यामुळं पुण्यातील डेक्कन परिसरात असलेला बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळं भिडे पुलावर पुणे मेट्रोकडून सुरू असलेलं काम देखील थांबविण्यात आलं असून आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 28 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान कोकण, गोवा येथे बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.