रायगड- दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं. या प्रकारानंतर भाजपासह विरोधकांनी ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी ठाकरे गटावर थेट हल्लाबोल करत मोठं विधान केलंय. गोगावले म्हणाले की, "काँग्रेस आणि महाविकास आघाडी सोबत राहिल्यास काय अवस्था होते हे देशाने पाहिलंय. महाराष्ट्रालाही मान खाली घालावी लागली. अजूनही त्यांनी विचार करावा, काँग्रेसची पद्धत काय असते ती. आता सहाव्या रांगेत बसवलंय, अजून कितव्या रांगेत टाकतील हे सांगता येत नाही. याचा महाराष्ट्रातील जनतेनेही विचार करावा." त्यांनी पुढे सांगितलं की, काँग्रेससोबत राहून उद्धव ठाकरे यांना केवळ अपमानच सहन करावा लागणार आहे. दिल्ली बैठकीतील घटना ही त्याची ज्वलंत उदाहरण असल्याचं गोगावले यांनी नमूद केलं. या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीवर सुरू असलेलं भाजपा नेत्यांचं टीकास्त्र आणखी धारदार होण्याची चिन्हं आहेत.