ठाणे - महाराष्ट्रात आज सर्वत्र दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होतोय. याच सणासाठी स्पेनचे पथक देखील सहभागी झाले आहे. मागील तीन दिवस 111 कॅसलर्सचे पथक भारतात येऊन सराव करत होते त्यांनी आज वर्तकनगर मधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होत भरपावसात मानवी मनोरे रचले. यावेळी स्पेनच्या संगीताच्या तालावर त्यांनी आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. दरवर्षी दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी स्पेनचे कॅसलर्स भारतात येत असतात. प्रो गोविंदाच्या आयोजनानंतर पूर्वेश सरनाईक यांनी स्पेनच्या या टीमला आमंत्रण देत त्यांना या उत्सवात सहभागी करून घेतलं. त्यांना राज्य सरकारच्या पाहुण्यांचा दर्जा देत भारतीय गोविंदांना स्पेनच्या या अनोख्या कलेचं प्रदर्शन घडवलं. त्यांची मनोरे रचण्याची अनोखी कला ही आपल्यापेक्षा वेगळी आहे. त्यांच्याकडे 6 वर्षापासून ते 66 वर्षापर्यंतचे कॅसलर्स या खेळात सहभागी होत असतात पण त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख असते. लहान मुलांना हेल्मेट बंधनकारक असतं. तर एकमेकांना पकडण्यासाठी त्यांच्या अंगाभोवती पट्टी बांधलेली असते. स्पेन आणि भारतातील हा दहीहंडी उत्सव संपूर्ण जगभरात पाहिला जातो.