बदलापूर (ठाणे) - मुंबई आणि उपनगरासह राज्यातील अनेक भागात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. बदलापूर, उल्हासनगर येथील उल्हास नदी ही मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे तुडुंब भरली आहे. तसेच जोरदार पडत असल्या पावसामुळे नदी पात्रातील पावसाच्या पाण्याच्या प्रवाह वाढला आहे. उल्हास नदी ही प्रामुख्यानं बदलापूर उल्हासनगर आदी शहरातून जाते. परंतु सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे नदीतील पाणी वाढलं आहे. पाऊस जर असाच बरसत राहिला तर नदीतील पाणी नदीपात्राबाहेर येऊ शकते, असं प्रशासनानं सांगितलं आहे. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना लोकांना त्रास होत आहे.